सांगोला : येथील भर चौकात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकाने प्लॉटिंग व्यवसायिकाला पिस्तुल दाखत धमकावल्याची घटना ऐन निवडणुकीच्या काळात घडल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणे कडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सांगोल्यातील कडलास नाका येथील हॉटेल बालाजी येथे सायंकाळी चहा व नाश्ता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याचवेळी प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्या एजंटाच्या चार चाकी गाडी समोर एक अज्ञात व्यक्तीने स्कृटी गाडी आडवी लावली. त्या व्यक्तीने एजंटाला पिस्तूलचा धाक दाखवत ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. एंजट धावत हॉटेलमध्ये गेला. अचानक घडलेल्या घटनेन त्याठिकाणी गर्दी झाली.त्यावेळी अज्ञात व्यक्ती पसार झाला. या घटनेमुळे सांगोल्यामध्ये गोळीबार झाल्याची चर्चा होती. सर्वत्र भीतीचे वातावरण होते.पोलिसाकडून घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरु होते. रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.