भारत कदम
सांगोला : सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या माण नदीने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तळ गाठल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. नदी पात्रातील पाणी आटल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीपंप खाली घेण्यासाठी नदीकाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
सर्वाधिक फटका अकोला, वासुद, नाझरा, कडलास येथील शेतकऱ्यांना बसला आहे. येथील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत बसवले गेले नाहीत. दरवाजे वेळेत टाकले नसल्यामुळे व वेळेत गळती न काढल्याने बंधाऱ्यात पाणी साठवता आले नाही, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. याचा फटका परिणामी नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीपंप व पाईपलाईन फुटबॉल उघड्यावर झाले आहे. उत्पादनावर सध्या ज्वारी, मका, गहू, कडवळ, हरभरा व ऊस ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पाण्याअभावी गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी पर्यायी पाण्याच्या स्रोतांचा शोध घ्यावा लागत आहे.
काही शेतकरी विहिरींचा आधार घेत आहेत, तर काहींनी नदीपात्रात पाणी असेपर्यंत शेतीपंप चालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे. नदीवरील बंधाऱ्यांची गळती न थांबवणाऱ्या व वेळेत दरवाजे न टाकणाऱ्या ठेकेदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत बसविले असते तर काही प्रमाणात पाणी साठवून शेतीला दिलासा मिळाला असता, अशी भावना शेतकरीवर्गामधून व्यक्त होत आहे.