सांगोला : सांगोला तालुक्यातील 1 लाख 61 हजार 200 पैकी 1 लाख 42 हजार 530 जनावरांना लस टोचणी केली आहे. उर्वरित 18 हजार 670 जनावरांना लाळ खुरकुत रोगाचे लसीकरण करण्याचे कामकाज सुरु आहे. हा रोग अतिशय संसर्गजन्य आहे. गाई, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढ्या अशा दोन खुरं असणाऱ्या जनावरांना पटकन होतो. त्यामुळे पशुपालकांनी वेळेवर लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच लसीकरण केल्यानंतर जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय लसीकरण करण्यापूर्वीच जनावरांमध्ये लाळ खुरकुतची लक्षणे दिसत आहेत का? यावरही लक्ष द्यावे, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील बहुतांश नागरिकांनी शेती उद्योगाबरोबर पशुपालन व्यवसाय निवडला आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय विभागाकडील मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण 1 लाख 61 हजार 200 जनावरांची संख्या आहे. या जनावरांना शासनाच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाचे एकूण 24 पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. पैकी चार दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने सध्या तेथील पदे रिक्त आहेत. उर्वरित 20 डॉक्टरांच्या मदतीने व इतर कर्मचाऱ्यांच्या साह्याने दीड लाखहून जनावरांवर उपचार आणि लसीकरण केले जात आहे. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून गाव पातळीवर जनावरांना लस टोचणी केली जात आहे.
लाळ खुरकुत आजार विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर ठोस कोणताही उपचार नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. निरोगी जनावरांना वर्षातून दोन वेळा मार्च-एप्रिल व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लाळ्या खुरकत रोगाचे लसीकरण करून घ्यावे. गाय, म्हैस, शेळी व मेंढीवर्गीय जनावरात वासरू, पिल्लू 4 महिन्याचे झाल्यावर प्रथम मात्रा द्यावी.
लसीकरणानंतर जनावरांना ताप येतो किंवा दूध उत्पादन घटते. तसेच गाभण जनावरांना लसीकरण करण्यास घाबरतात. त्यामुळे ते लसीकरणाला टाळाटाळ करतात. परंतु लसीकरण करणे हे कायम फायदेशीर असते. त्यामुळे भविष्यात येणारा मोठा धोका वाचतो. त्यामुळे पशुपालकांनी कोणतेही समज गैरसमज न ठेवता लाळ्या खुरकुत रोगाचे लसीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.