सांगोला : गेल्या दोन वर्षांपासून विमा योजनेत सहभागी होऊनही शेती व फळ पिकाची नुकसानभरपाई मिळाली नाही. यासह प्रत्येक पीकनिहाय जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील 18 हजार हेक्टरपैकी केवळ 424 हेक्टर डाळिंब क्षेत्रासाठी पीक विमा उतरवल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार 17 हजार 500 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकर्यांनी विमा उतरला नाही. यामुळे फळ पीक विमा योजनेकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे.
मृग बहर-2025 मध्ये डाळिंब पिकासाठी ही विमा योजना तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात आली आहे. शेतकर्यांना 14 जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत देण्यात आली होती. ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या बजाज प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकर्यांना परस्पर नुकसानभरपाई देणार होती. परंतु सांगोल्यातील शेतकर्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
मागील दोन ते तीन वर्षांत चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे व वेगवेगळ्या योजनेतून तालुक्याला पाणी मिळू लागल्यामुळे शेती ओलिताखाली आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. निसर्गकोपाच्या संकटातून सावरण्यासाठी विमा योजनेला पसंती दिली जाते. अवेळी पावसामुळे अनेक वेळा हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. शेतकर्यांनी संबंधित पिकांचा विमा उतरल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हिस्सा भरला जातो. पिकाचा विमा उतरल्यानंतर शेतकर्यांनी जास्तीत-जास्त नुकसानभरपाई तरी मिळेल, अशी शेतकर्यांची अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. अनेकदा नुकसान झाले तरी प्रत्यक्षात अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने शेतकर्यांचा विमा योजनेवर नाराजीचा सूर आहे.
सांगोला म्हणजे डाळिंबाचे कोठार असा उल्लेख केला जातो. सांगोल्याचे डाळिंब सबंध जगभरात प्रसिद्ध आहे. भयाण अशा माळरानावरदेखील आज शेतकर्यांनी डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगोल्यात 18 हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये चालू वर्षी केवळ 600 शेतकर्यांनी 424. 77 हेक्टर क्षेत्रासाठी पिकांचा विमा उतरविला असून, शेतकर्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यानुसार विमा एक योजनेवर शेतकर्यांमधून नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून फळबागांसाठी डाळिंब पिकाचा विमा भरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्यांना खरिपाचा व रब्बीचा विमाच मिळाला नाही. गतवर्षी मृग बहराचा डाळिंबासाठी विमा भरला होता. पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकर्यांना एक दमडीही मिळाली नाही, असे शेतकरी सांगतात. अनेकदा नुकसान झाले तरी प्रत्यक्षात अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने शेतकर्यांचा विमा योजनेवर नाराजीचा सूर आहे. त्यामुळे यंदा फळबाग लागवड पीक विमा योजनेकडे शेतकर्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.