Illegal Sand Mining pudhari photo
सोलापूर

Sangola Illegal Sand Mining: सांगोला येथे डीवायएसपी पथकाची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : माण नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून विना परवाना वाहतूक करणाऱ्या वाहनावर मंगळवेढा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे ५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालक, मालक व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमे दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माण नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने लोटेवाडी परिसरात सापळा रचला.

संशयित टमटम वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. मात्र चालक व त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

तपासणीदरम्यान वाहनात अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अशोक लेलैंड कंपनीचे टमटम वाहन (किंमत ५ लाख ७७ हजार रुपये), अंदाजे ७ हजार रुपयांची वाळू तसेच ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या प्रकरणी वाहन चालक दादा कांबळे व वाहन मालक बंटी कांबळे (रा. अचकदाणी) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT