सोलापूर

सोलापुरात ईदगाहबाहेर पाकिस्तानी फुग्यांची विक्री; दोघांना अटक

निलेश पोतदार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रपणे उत्साहाने आणि मंगलमय वातावरणात साजरी होत असताना सोलापुरात काही असामाजिक शक्ती सक्रिय होऊन शांतता व सुव्यवस्थेचा गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदानावर समूहिक नमाज अदा झाल्यानंतर ईदगाहाबाहेर बालबच्च्यांसाठी खरेदी केले जाणारे फुगे चक्क पाकिस्तानी असल्याचे आढळून आले. 'लव्ह पाकिस्तान' या मजकुरासह पाकिस्तानी ध्वज छापलेल्‍या फुग्यांची विक्री होताना मुस्लीम बांधवांनी वेळीच जागरूकता दाखविली. फुगे विकणा-या संबंधित दोन व्यक्तींना पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

अजय अमन पवार व शिवाजी लक्ष्मण पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) अशी फुगे विकणा-यांची नावे आहेत. या दोघांनी ज्या विक्रेत्यांकडून हे पाकिस्तानी ध्वजाचे फुगे खरेदी केले, त्या व्यापा-याचाही शोध घेण्यात आला असून, त्याचे नाव तन्वीर बागवान असे आहे. अडाणी, अशिक्षित असलेले हे अजय आणि शिवाजी हे पारधी समाजाचे फुगेवाले मधला मारूती परिसरात फुगे विकतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना ताब्यात घेऊन पोलीसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फुगे विक्री करणारा व्यापारी तन्वीर बागवान याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. या तिघांविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या आणि हिंदू-मुस्लीम एकोपा नष्ट करण्याच्या उद्देशाने भारतीय नागरिकांच्या सार्वभौमत्वाचा अवमान केल्याचा आरोप या तिघा संशयीत आरोपींवर ठेवण्यात आला आहे. तन्वीर बागवान याचे मधला मारूती परिसरात न्यू रोशन खिलौना हाऊस नावाचे दुकान आहे. या दुकानात पाकिस्तानी फुग्यांचा साठा करून विक्री केली जात होती.
गुरूवारी सकाळी होटगी रस्त्यावर नवीन आलमगीर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी परंपरेनुसार हजारो मुस्लीम बांधव लहान मुलांसह आले होते. नमाज अदा झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत, गळाभेट घेऊन मुस्लीम बांधव ईदगाहबाहेर आले. त्यावेळी समोर बालबच्चे कंपनीसाठी आकर्षित करणारे फुगे व इतर खेळण्यांची विक्री केली जात होती. त्यावेळी वडीलधारी मंडळी लहान मुलांसाठी फुगे खरेदी करीत असताना ते फुगे हातात घेतल्यानंतर धक्काच बसला. कारण त्या फुग्यांवर चक्क 'लव्ह पाकिस्तान' असा आक्षेपार्ह मजकूर ठळकपणे छापलेला होता. त्याच फुग्यांवर दुसरीकडे पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजाचेही चित्र होते. हे पाहून मुस्लीम बांधव लगेचच सजग झाले. त्यांनी तात्काळ हालचाल करून संबंधित दोघा फुगे विक्रेत्यांना ताब्यात घेऊन तेथील बंदोबस्तावरील पोलिसांच्या हवाली केले.

पाकिस्तानी फुग्यांची विक्री होत असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. लहान मुलांनी खरेदी केलेले हे पाकिस्तानी फुगे इतरांनी पाहिले असते तर त्यातून वेगळा गैरसमज निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला असता. एकीकडे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रपणे साजरी होत असताना गोवंशांची हत्या होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सक्रिय होऊन सार्वजनिक रस्त्यांवरील गोवंशाची तस्करी पकडत आहे. तत्पूर्वी, औरगजेबाचे आक्षेपार्ह स्टेटस् समाज माध्यमांवर ठेवण्याचा प्रकार घडल्यामुळे समाजात शांतता भंग करण्याचे प्रकार घडले आहेत. बकरी ईदच्या दिवशी चक्क पाकिस्तानी फुगे विकण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT