करमाळा : सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे निर्मित सैराट चित्रपटात श्रीदेवीचा माळ येथे चित्रित केलेल्या वाळलेल्या झाडाची एक-एक फांदी तुटून पडू लागली आहे. ते झाड पाहण्यासाठी आलेल्या सिनेरसिकांतून निराशा व्यक्त होत आहे.
मराठी सिनेसृष्टीत कोटीची उड्डाणे केलेल्या सैराट चित्रपटातील हे वाळलेले झाड खूप चर्चेत आलेले होते. त्या वाळलेल्या झाडाच्या दोन फांद्यावर आर्ची आणि परश्याचे गाणे चित्रित झालेले होते. ते गाणे खूपच गाजलेले होते. ते झाड पाहण्यासाठी आजही रसिक प्रेक्षक गर्दी करतात व या झाडा सभोवती सेल्फी काढतात. शिवाय त्या झाडावर चढून आनंद लुटतात.
वाळलेल्या या झाडाची एक फांदी गेल्यावर्षीच तुटून पडलेली आहे. तर दुसऱ्या फांदीची मोडतोड झालेली आहे. हळूहळू हे झाडचं नामशेष होऊ पाहत आहे. हे चित्र पाहून परगावातून श्री कमलाभवानी देवीचे मंदिर, त्याशिवाय 96 पायऱ्यांची दगडी महाकाय विहीर व त्या शेजारीच असलेले वाळलेले झाड पाहण्यासाठी आलेले युवक व युवती निराशा व्यक्त करीत आहेत.
सैराट चित्रपटात चित्रित केलेले हे वाळलेले झाड प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही येथे आलो. झाडाची झालेली दुरवस्था पाहून मनातून निराशा निर्माण झाली. परगावाहून आलेल्या पर्यटकांना एक कुतूहल म्हणून या वाळलेल्या झाडाचे जतन करणे आवश्यक आहे.-नागेश चेंडगे, कोळगाव, ता. करमाळा