सोलापूर

Ashadhi Wari: पंढरपुरात तुळशी माळा बनविण्याची लगबग

विठ्ठल आणि वारकर्‍यांना एका धाग्यात बांधणारी तुळशी माळ; पंढरपुरात ३०० वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीहार तर वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीमाळ असते. विठ्ठल आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. विठ्ठल आणि वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय गेल्या तीनशे वर्षांपासून चालत आलेला आहे. आषाढी यात्रेनिमित्त तुळशीमाळा बनविण्याची लगबग सुरू आहे.

पंढरीच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ हीच वारकऱ्यांची ओळख असते. विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही १०८ मण्यांची तुळशीमाळ बनवली जाते. वारकरी संप्रदायाच्या उगमापासून ही तुळशीमाळ बनविण्याचा व्यवसाय काशीकापडी समाज करीत आहे. पंढरपुरात गेल्या ३०० हून अधिक वर्षे हा व्यवसाय आपला समाज करीत आला असल्याचे या समाजातील नागरीक सांगतात.

दरम्यान आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघ यात्रा कालावधीत जवळपास दोन महिने हे काम जोरात चालते. असे असले तरी वर्षभर या तुळशीमाळांना वारकरी संप्रदायाकडून मोठी मागणी असते. मात्र, या माळेतून घर प्रपंच चालेल असे उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे आता या समाजातील तरुण या व्यवसायापासून लांब जाऊ लागला आहे. यातच या भक्तीच्या बाजारात लाकडी भुश्यापासून मशीनवर बनविलेल्या चीनी माळेने आक्रमण केल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे.

वारकरी संप्रदायाला तुळशीमाळ म्हणजे जगण्याचे अगाध तत्वज्ञान देणारी आहे. याच भावनेने जशी विवाहित स्त्रियांची ओळख मंगळसुत्राने होते तशीच वैष्णवांची ओळख या तुळशीमाळेने होते. देवाला तुळस प्रिय, म्हणूनच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते. पंढरपुरात ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून या माळेला इथे विशेष महत्त्व असते.

अंगणात तुळशीची पूजा केली जाते. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याप्रमाणे तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात, अशी भागवत धर्मात धारणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT