rock salt vs normal salt
सोलापूर : मीठ हा रोजच्या आहारातील अत्यावश्यक घटक. पण, कोणते मीठ वापरावे, याबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. पांढरे मीठ घातक आणि सैंधव किंवा पिंक सॉल्ट अधिक आरोग्यदायी असा समजही वाढला आहे. प्रत्यक्षात रोजच्या आहारातून आवश्यक आयोडिन मिळण्यासाठी आयोडिनयुक्त मीठ वापरणे अधिक योग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
सैंधव मिठामध्ये सोडियमचे प्रमाण पांढऱ्या मिठापेक्षा किंचित कमी असले, तरी त्याचा खारटपणा कमी जाणवत असल्याने ते अधिक प्रमाणात वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सोडियमचे सेवन कमी होण्याऐवजी वाढू शकते. सैंधव किंवा पिंक सॉल्टमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे असली, तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प असते. पिंक सॉल्टचा गुलाबी रंग प्रामुख्याने आयर्न ऑक्साईडमुळे येतो.
नक्की काय फरक असतो?
गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी आयोडिन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ सैंधव मिठावर अवलंबून न राहता आयोडिनयुक्त मिठाला प्राधान्य द्यावे. चवीनुसार सैंधव मीठ वापरायचे असल्यास मिश्र पद्धतीने आणि प्रमाणात वापरावे. बीपी, हृदय व किडनीच्या रुग्णांनी कोणतेही मीठ असो, त्याचे प्रमाण काटेकोरपणे पाळावे, असे तज्ज्ञ सांगतात.
डब्लूएचओची मीठ सेवनाची मर्यादा
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढांनी दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करावे. लहान मुलांसाठी ही मात्रा त्यांचे वय आणि गरजेनुसार आणखी कमी असावी. जास्त मीठ म्हणजेच सोडियमच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मीठ कोणते आहे यापेक्षा किती प्रमाणात वापरले जाते, हे महत्त्वाचे आहे.
फास्टफूडमधून सोडियमचा मारा
पिझ्झा, बर्गर, चिप्स, नूडल्स आणि रेडी-टू-ईट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण मोठे असते. चटपटीत चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांमुळेही सोडियमचे सेवन वाढते. त्यामुळे घरच्या जेवणातील मीठ कमी करण्यासोबतच प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.