सोलापूर : दूषित पाणीपुरवठा शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 10) झोन आठमधील कुचन नगरात रोबोटचे प्रात्यक्षिक घेतले. पहिला प्रयोग यशस्वी झाला. रोबोटने पाणीपुरवठ्याच्या लाईन मधील अनेक त्रुटी समोर आणल्या. चुकीच्या पद्धतीने घरगुती कनेक्शन, पाईपलाईनमध्ये घाण, कपड्याचे बोचके आणि इतर साहित्य असल्याचे रोबोटने ऑनलाइन प्रात्यक्षिक करून निदर्शनास आणले. त्यामुळे आता रोबोट दूषित पाणी असल्याचा शोध घेणार आहे.
शहरात चार दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्यामुळे वातावरण तापले आहे. दोन शाळकरी मुलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो, त्या भागात महापालिकेचा आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभाग सतर्क होऊन काम करत आहेत. भवानी पेठमध्ये बुधवारी (दि. 9) दूषित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेने शहरातील पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन तपासणीसाठी रोबोटचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी झोन क्रमांक आठमधील कुचन नगर मधील चौकामध्ये मुंबईवरून आलेल्या रोबोटच्या माध्यमातून पाईपलाईनच्या तपासणीचे प्रात्यक्षिक घेतले. प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली.
ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठ्याची लाईन तपासण्यासाठी दोन वेगवेगळे रोबोट खरेदी केले जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये तीन कोटींची तरतूद आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केली आहे. याबाबत ड्रेनेज विभाग आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील अधिकार्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन पाहणी केली आहे.
दूषित पाणीपुरवठ्याची पाहणी रोबोटच्या सहाय्याने केली. या पाहणी दरम्यान रोबोटने पाणीपुरवठ्यातील अनेक त्रुटी समोर आणल्या. पाईपलाईनच्या वरच्या भागातून नळ कनेक्शन देणे अपेक्षित असताना जमिनीच्या लेवलवरून कनेक्शन दिले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाईप पाईपलाईनमध्ये सोडला गेल्याचे निदर्शनास आले. त्याशिवाय पाण्याच्या पाईपमध्ये घाण कपडे, चिंध्या इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.
दूषित पुरवठा होणार्या भागातील तक्रारींसाठी महापालिकेमध्ये वॉररूम तयार केली आहे. चावी वाले, तज्ज्ञांची वॉररूममध्ये नियुक्ती केली आहे. दूषित पाणीपुरवठ्यात संदर्भात तक्रारी आल्यास तेथील पथक घटनास्थळी जाऊन रोबोटच्या माध्यमातून तपासणी करून नेमका दोष कुठे याची तपासणी करून त्याची दुरुस्ती करणार आहे.
पाणीपुरवठ्याची गळती आणि ड्रेनेजलाईनची गळती शोधण्यासाठी रस्ते वारंवार खोदावे लागत होते. हे टाळण्यासाठी आता रोबोटचा वापर केला जाणार आहे. महापालिका दोन रोबोट खरेदी करेल. त्याचे प्रात्यक्षिक कुचन नगरमध्ये घेतले.संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका