पंढरपूर : शहरातील सराफ व्यावसायिक दिलीप कदम हे दुकानातून आपल्या घराकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलीस पंढरपूर शहरातील कराड नाका येथे कारने धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यांच्या ताब्यातील बॅग घेऊन पलायन केले. या प्रकरणातील आरोपी फरार होते. मात्र, पोलिसांनी तपास करून या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. जीवन उर्फ करण बंडु गिरी गोसावी (वय 22, रा. विप्रदत्त घाट, कालिकादेवी चौक), शुभम सुभाष जाधव (वय 26, रा. जगदंबा नगर, संत पेठ, पंढरपूर) अशी त्यांची नावे आहेत.
पंढरपूर शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या कदम ज्वेलर्सचे मालक दिलीप कदम हे 22 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून रात्री 9 वाजता आपल्या घराकडे दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा जुना कराड नाका परिसरात त्यांच्या पाठीमागून कार आली. या कारने त्यांना धडक दिली. कारमधील दोघेजण बाहेर आले. त्यांनी कदम यांच्या जवळील बॅग पळवून नेली. मात्र, या बॅगमध्ये दुकानाच्या किल्ल्यांव्यतिरिक्त काहीही नव्हते. त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र धडक बसल्यामुळे कदम जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर कदम यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन जगताप, पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेश गोसावी, सचिन हंबाडे, शरद कदम, गोडसे, पाटील, नवले यांनी केला.
अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्यास धडक देऊन बॅग पळवून नेली असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी करडी नजर ठेवली होती. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू ठेवून दोन जणांना अटक केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.