सोलापूर : देशात पुरुषांमध्ये वाढणारा तोंडाचा कर्करोग हा सध्या चिंताजनक विषय बनला असून शिवाय या आजाराच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) या संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सध्या बदलत असलेली जीवनशैलीसह तंबाखू व सुपारीचे वाढते सेवन याला कारणीभूत असले तरी उशिरा होणारे निदान या आजाराच्या वाढीमागील मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांकडून अधोरेखित केले गेले आहे. या धर्तीवर सध्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या तीन वर्षात पाच लाखाच्या पटीने रूग्णसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळते. केंद्र व राज्य सरकारकडून या आजाराला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अभ्यासावरून तयार केलेल्या अहवालात पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग हा देशात सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक ठरला आहे. देशातील काही भागांमध्ये अन्य कर्करोगांपेक्षाही तोंडाच्या कर्करोगाचे रूग्ण अधिक असल्याचे दिसून आले. ग्रामीणपेक्षाही शहरात हा आजार वेगाने पसरत आहे. 30 ते 50 वयोगटातील तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वाढताना दिसत असून ही बाब चिंताजनक ठरली आहे.
हा कर्करोग वृद्धांपुरता मर्यादित राहिला नाही. बदलती जीवनशैली, कामाचा ताण व जीवनशैलीतील अनियमिततेसह व्यसनाधीनतेने तरुण पिढी या आजाराला बळी पडताना दिसून आहे. याशिवाय अशा आजारावर उशिरा होणाऱ्या निदानामुळे तोंडाच्या कर्करोगात वाढ होते. रुग्णांकडून सुरुवातीच्या काळातील लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेत वैद्यकीय तज्ज्ञाकडून वैद्यकीय सल्ला घेतला जात नाही. त्यामुळे बहुतांश रुग्णांच्या आजाराच्या प्रमाणात वाढ झालेली आढळते.