Rice Price  
सोलापूर

Rice Price Hike : तांदळाचे डिसेंबरमध्ये पुन्हा दरवाढीचे संकेत

कर्नाटक, आंध्र प्रदेशातील उत्पादन घटले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मागील महिनाभरात तांदळाच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने डिसेंबरपासून तांदूळ पुन्हा महागण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण तांदळापैकी सुमारे ९० टक्के तांदूळ या दोन राज्यांतून येतो. त्यामुळे तेथील उत्पादनातील घट आणि आवकेतील बदलाचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मार्च आणि डिसेंबर अशा वर्षातून दोन वेळा तांदळाचे पीक घेतले जाते. यंदा कमी पावसामुळे मार्चमधील उत्पादन घटले आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पेरणी करू नये, असे आवाहन केले होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला.

परिणामी आगामी काळात तांदळाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी किलोमागे १०० रुपयांच्या पुढे गेलेल्या तांदळाच्या किमती आता खाली आल्या आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली भागातून तांदळाची आवक झाल्याने बाजारातील दर कमी झाले. मात्र डिसेंबरमध्ये नवीन आवक आणि उत्पादनाची स्थिती पाहता दर पुन्हा वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बासमती १००, इंद्रायणी ८२ तर कोलम ८० रू

आंबेमोहोरच्या दरात निम्म्याने घट झाली. मागील वर्षाच्या तुलनेत ही मोठी घसरण झाली आहे. गेल्यावर्षी किलोमागे १५० रुपये असलेला आंबेमोहोर यंदा ८० रुपयांवर आला आहे. इतर प्रमुख तांदळाचे दरही गेल्या महिनाभरापासून कमी झाले आहेत. स्टीम सोना मसुरी ५५ रुपये, आरएनआर ७० ते ७२ रुपये, एचएमटी ७० ते ७२ रुपये, तर कोलम ७८ ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. इंद्रायणी ओरिजनल ८२ रुपये, कमी सुगंधित इंद्रायणी ७२ रुपये आणि बासमती १०० रुपये किलो आहे.

महिनाभरात तांदळाच्या दरात घसरण झाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली भागातून तांदळाची आवक झाल्याने बाजारात दर नियंत्रणात आले. मात्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कमी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये नवीन आवक कमी राहिल्यास तांदळाचे दर पुन्हा वाढू शकतात.
- मंजुनाथ अजगुंडे, तांदूळ व्यापारी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT