मोहोळ शहर : देवस्थानच्या नावे असलेल्या जमिनीवरील बेकायदेशीर नावे तत्काळ रद्द करुन मूळ जमिनी देवस्थानच्या नावे करण्यात याव्यात, या न्यायालयाच्या आदेशाला महसूल विभागाने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील देवस्थानच्या नावे 8636 हेक्टर128 आर एवढी जमीन आहे. या देवस्थानच्या जमिनीवर इतर लोकांची नावे लावून घेतली आहेत. या देवस्थानच्या नावे असलेल्या जमीनवर बेकायदेशीरपणे काही लोकांची नावे लावली आहेत.ही नावे कमी करण्यात यावी म्हणून मोहोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच हरिभाऊ पाथरूट यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ज्या देवस्थानच्या जमिनींवर सातबारा उतारावर नावे लागली आहेत. ती रद्द करण्यात यावीत व त्या ठिकाणी देवस्थानचे नाव लावून पुजारी किंवा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता.मात्र शासकीय विभागातील महसूल अधिकारी व कर्मचार्यांनी या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसून आले.
देवस्थानच्या जमिनीवरील नावांबाबत न्यायालयाचे आदेश असताना महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे महसूल विभागाने न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत याचिका दाखल करणार आहे.- हरिभाऊ पाथरूट, सामाजिक कार्यकर्ते