जेऊर; पुढारी वृत्तसेवा : सध्या देशभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. पाळीव प्राणी तसेच जंगली प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. उन्हामुळे तहानलेले प्राणी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा प्राण्यांना शेतात किंवा घराबाहेर पाण्याची व्यवस्था करुन अशा प्राण्यांना दया दाखवावी. सोलापूर मध्ये एक प्रकरण असे घडले, ज्यामध्ये एका सर्पमित्राने विहीरीत अडकलेल्या घोणस या विषारी सापाला बाहेर काढले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून करमाळा तालुक्यातील आवाटी येथे एका विहीरीत भारतातील सर्वात विषारी असलेला रसल वायपर म्हणजेच घोणस जातीचा साप विहीरीत पडलेला होता. विहीरीला पायरी नसल्यामुळे त्याला वर चढता येत नव्हते. या सापाला वाचविण्यासाठी बुधवारी (दि. २६) विहीर मालक यांनी सर्पमित्र माधव हनपुडे यांना फोन केला. त्यानंतर माधव हनपुडे व शिवनाद वसुंधरा परिवारचे संस्थापक विजयजी खंडागळे व सर्व टिमने आवाटी येथे धाव घेतली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहीरीचे पाणी अगदी तळाला गेले होते. या पाण्याच्या शोधात हा घोणस विहीरीमध्ये पडला होता. या विहीरीला खाली उतरण्यासाठी पायरी नसल्यामुळे या सापाला बाहेर कसे काढायचे हा मोठा प्रश्न होता. या विहीरीत उतरुन हा विषारी साप काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या घोणस जातीच्या सापाला वाचवण्यात सर्पमित्र माधव हनपुडे व गौंडरे येथील शिवनाद वसुंधरा परिवारच्या सर्व टिमला यश आले. यावेळी बोलताना सर्पमित्र माधव हनपुडे यांनी शेतकरी व नागरिकांना आव्हान केले की उन्हाळ्यात पाण्यावाचुन प्राण्यांचे व पशु पक्षी यांचे मोठे हाल होत आहेत. तरी आपण सर्वानी माणुसकीचा धर्म जपत अशा प्राण्यांसाठी शेतात किंवा घराबाहेर पाणी ठेवा. ज्यावेळी असे प्राणी,पक्षी, आपल्या घराच्या जवळ किंवा शेतात येतात तेव्हा कुणीही अशा जिवांना मारु नका.