पंढरपूर : वाखरी येथील बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होते. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी उड्डाणपुलाच्या शेजारी असणारे लोखंडी बॅरेकेडिंग रिंगण सोहळा कालावधीत काढून घेण्यात यावे. पालखीतळांवर पालखी सोहळ्यासोबत येणार्या वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार्या सुविधांची माहिती भाविकांना द्यावी, अशी सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत पालखी सोहळ्यासोबत येणार्या वारकरी भाविकांना पालखी तळांवर, भक्ती सागर (65 एकर), चंद्रभागा वाळवंट येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. भक्ती सागर 65 एकर येथे पाणी साचणार नाही, याची दक्षता घेऊन मुरमीकरण व रोलिंग करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती तांत्रिक मदत संबंधित यंत्रणेला करावी. तसेच याठिकाणी वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे. स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता करावी.
पालकमंत्री गोरे यांनी वाखरी, बाजीराव विहीर, श्री संत सोपान काका, भंडीशेगाव, पिराची कुरोली, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, धर्मपुरी येथील पालखी तळांची व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील, आ. उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, डीवायएसपी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते