सोलापूर : महापालिका प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्याने पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू महापालिकेत अक्षरशः जागेवरच सडल्या आहेत. यावर दैनिक ‘पुढारी’च्या अंकातून प्रकाश टाकला होता. ‘महापालिकेत दीड महिन्यापासून रेशन किट अडगळीत’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने दणका देताच महापालिका अधिकारी ताळ्यावर आले असून जिल्हा प्रशासनास पत्र देऊन शिल्लक किट घेऊन जाण्याची विनंती केली आहे.
सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक उपनगरांतील हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. घरातील भांडी, धान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचे जगणे कठीण झाले. अशा परिस्थितीत शासनाने पूरग्रस्त लाडक्या बहिणींसाठी दिवाळीपूर्वी विशेष रेशन किट उपलब्ध करून दिले होते. या किटचे वितरण करण्यामध्ये महसूल व महापालिका प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्याने पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू महापालिकेत अक्षरशः जागेवरच सडल्या होत्या.
झोन सहामध्ये पडल्या होत्या. याबाबतचे वृत्त प्रसारित होताच झोन अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास पत्र देऊन शिल्लक किट घेऊन जाण्याची विनंती केली आहे. सदरचे किट अस्ताव्यस्त पडले होते. ते किट बातमी प्रसारीत झाल्यानंतर व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. जागा स्वच्छ करण्यात आली आहे. पूरगस्त सदरचे किट घेऊन जाण्यासाठी आले नाहीत, त्यामुळे कीट शिल्लक आहेत.