हंजगी ः अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी राजश्री धनंजय मुंडे (परळी), उद्योगपती चंद्रकांत पाटील (मुंबई), संजय पाठक, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक रमेश कापसे, शैलेश राठोड, बसवराज माशाळे, अशोक हारकुड, सनी देवकते आदी उपस्थित होते.
प्रकटदिनानिमित्त विविध पुष्पमालांनी सजावट केलेल्या मठात पहाटे 5 वाजता काकडा आरतीने कार्यक्रमांची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांसाठी मठ दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी 10 वाजता महाअभिषेक सोहळा पार पडला. दुपारी 12.35 वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा व महाआरतीने स्वामींचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भजन सेवेत कृष्णा मोरे, काशीनाथ काळे, आण्णाजी सुरवसे, अर्जुन मोरे, नेताजी मोरे, बाळू मोरे, अमोल जाधव, बलभीम पवार, सिध्देश्वर भंडारे, काशीनाथ पोतदार यांनी गायन केले. हार्मोनियमवर बळीराम जाधव, श्याम पोतदार, नागनाथ परळकर यांनी साथ दिली, तर तबल्यावर हर्षद पटेल व अप्पासाहेब काळे यांनी संगत केली.
यानंतर मठात महाप्रसादाचे नैवेद्य दाखवून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सेवेचे नियोजन रवी कुलकर्णी (पुणे) यांनी केले. प्रकटदिन सोहळा यशस्वी करण्यासाठी अन्नु महाराज, महेश महाराज, धनंजय महाराज, अनुप महाराज, आदित्य महाराज, नितीन महाराज, केदार महाराज, सुनील पुजारी तसेच मठातील पुजारी व सेवेकरी आणि स्वामीभक्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी दिवसभर दर्शन घेऊन या सोहळ्याचा लाभ घेतला.