गुळवंची : उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे सोलापूर तालुका पोलिस स्टेशन व लोकमंगल साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
‘सुरक्षित वाहतूक सुरक्षित चालक’ या घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश रात्रीच्या वेळी अपघात टाळणे आणि दृश्यमानता वाढवणे हा आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर टेप नसणे, आरसे न लावणे, मोठ्या आवाजात ‘म्युझिक सिस्टीम’ लावणे, वाहनाबाहेर येईल अशा पद्धतीने ऊस भरणे, शेतातून मुख्य रस्त्यावर इतर वाहनांचा अंदाज न घेता ट्रॅक्टर, ट्रेलर आणणे आदी कारणांमुळे अपघात होऊ शकतात. नियमाचे पालन करण्याचे आवाहन यानिमित्त करण्यात आले.
अपघाताची शक्यता, दंडाचीही तरतूद
यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऊस वाहतूक करताना अपघात होऊ नये, यासाठी वाहतूकदार चालक-मालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्या व ट्रक या वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड व टेप बसविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यास वाहनचालक-मालकाला दंड होणार आहे.