सोलापूर : देशापुढील आर्थिक आणि औद्योगिक आव्हाने मोठी आहेत. त्यासाठी स्वदेशीचा अवलंब करण्याची गरज आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाटी शालेय स्तरापासूनच गणितासारख्या विषयात पारंगत व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ, खा. उज्ज्वल निकम यांनी केले.
प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेच्या वतीने संगमेश्वर महाविद्यालयाच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहात बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेचे प्रोफेसर वामसी प्रीतम पिंगळी यांना पाचव्या गणितरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. एक लाख 11 हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याप्रसंगी खा. निकम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. एन. के. ठाकरे, लक्ष्मी हायड्रोलिक्सचे चेअरमन शरद ठाकरे, संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, ॲड. धनंजय माने उपस्थित होते.
यावेळी इतर मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. प्रारंभी संगमेश्वर महाविद्यालयाच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सभागृहाचे लोकार्पण खा. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणितरत्न समितीचे प्रो. बी. एन. वाफारे, लक्ष्मी हाड्रोलिक प्रा. लि.चे संचालक आदित्य ठाकरे यांच्यासह गणितज्ज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह शैक्षणिक वर्तुळातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
‘नोबेल’च्या धर्तीवर सन्मान
ठाकरे गौरव संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींना गणितरत्न पुरस्कार देण्यात येतो. यापुढे नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर भारतीय नागरिकांचा गौरव करणे हे संस्थेचे ध्येय आहे. आता केमिकल सायन्ससह इतर वैज्ञानिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. एन. के. ठाकरे म्हणाले.