बार्शी : सर्वच पदाधिकाऱ्यांचा सन्मान कसा होईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. बार्शीत माजी आ. राजेंद्र राऊत जरी विधानसभा निवडणुकीत हरले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके असून, आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. तालुक्यातील द्राक्ष बागायतदार व इतर शेतकऱ्यांनाही नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा लाभ शेतकऱ्यांना भेटावा, यासाठी राऊत हे नेहमीच आग्रही होते, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
बार्शी येथे लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व माढा, बार्शी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, राऊत यांनी मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांकडे, अधिकाऱ्यांकडे जाऊन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यादृष्टीने त्यांनी मोठे प्रयत्न केले. भाजप पदाधिकाऱ्यांनी होऊ घातलेल्या नगरपालिका पंचायत समिती, जिल्हा परिषद व बाजार समितीच्या या सर्वच निवडणुकीसाठी सज्ज राहावे, अशा सूचनाही गोरे यांनी या बैठकीत दिल्या.
विधानसभेच्या निवडणुकीने तालुक्याचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यात सुरू असलेला विकासाचा वेग आज खंडित झाला आहे. बार्शीत विकासासाठी संघर्ष झालेला मला दिसत नाही, असेही गोरे यांनी म्हटले. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा पालकमंत्री गोरे यांच्यासमोर मांडल्या.