पिलीव : माळशिरस तालुक्यातील बचेरी, शिंगोर्णी, काळमवाडी, सुळेवाडी, गारवाड, पठाण वस्ती, चांदापूरी यांच्यासह वंचित 22 गावांना नीरा देवघर प्रकल्पाचे पाणी मिळावे. पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घ्यावी, लागणारा सर्व निधी तातडीने मंजूर करावा. पूर्व बाजूने (माळशिरस तालुक्यातून) तातडीने काम चालू करावे, या मागणीठी रविवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. माळशिरस ते म्हसवड रोडवर गारवाड चौक माणकी पाटी या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. यापूर्वी शिग़ोर्णी ते शिखर शिंगणापूर पर्यंत पायी चालत निरा देवधर पाणी संघर्ष पदयात्रा काढली होती. त्या पदयात्रेस ग्रामस्थातून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर आ. उत्तमराव जानकर यांना निरा देवधर प्रकल्पाच्या पाण्यासाठी उर्वरित वंचित 22 गावासाठी आंदोलन करावे लागत आहे. याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी व शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला आहे. गावभेट दौर्यात माणकी, जळभावी, गारवाड, पठाणवस्ती, चांदापूरी, तरंगफळ, पिलीव, सुळेवाडी, काळमवाडी, बचेरी, शिंगोर्णी या गावाचा दौरा सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आयोजित केला असल्याची माहिती नागरी आघाडीचे अध्यक्ष अरिफखान पठाण यांनी दिली. आज शुक्रवार दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत माणकी ते शिग़ोर्णी पर्यंत तर शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत कोथळे ते इस्लामपूर पर्यंत गावभेट दौरा असणार आहे.
शेतकर्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे
गारवाड पाटी येथे जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे. यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून नीरा-देवधरचा हा पाणी प्रश्न शासन स्तरावर मार्गी लागून त्याला गती प्राप्त होणार असल्याचे आ. उत्तमराव जानकर यांनी सांगितले.