माळशिरस : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पीकविमा आणि नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्नावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आवाज उठवला. सोलापूर जिल्ह्यातील 73 हजार 718 शेतकर्यांची सुमारे 81 कोटी 80 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळालेली नाही. परिणामी हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ही रक्कम तातडीने वितरित करावी.
तसेच,शेतकर्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गट व तालुका पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी, जेणेकरून स्थानिक पातळीवरच तक्रारींचा जलद निपटारा होईल. अशी मागणी केली आहे. मोहिते पाटील यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर एक टोल-फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी केली. त्याचबरोबर, विविध विमा कंपन्यांकडून मिळणार्या तक्रारींचे एकत्रीकरण करून एकत्रित डिजिटल यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून शेतकर्यांना कोणत्या कंपनीने किती मोबदला दिला, याची पारदर्शक माहिती मिळू शकेल अशी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली.
या मुद्द्यांवर उत्तर देताना मंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, 20 जून अखेर सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 लाख 32 हजार 851 अर्जदार शेतकर्यांची नुकसानभरपाई 278.71 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यात स्थानिक व व्यापक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 1 लाख 59 हजार 699 शेतकर्यांना 197.63 कोटी रुपये भरपाई वितरित करण्यात आली आहे.
तर काढणी पश्चात नुकसान व उत्पादनातील घट यासाठी 69,954 शेतकर्यांसाठी 81.80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात लवकर जमा होण्यासाठी विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून विमा हप्ता अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 4 ते 5 दिवसांत शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले.