सोलापूर

Raju Shetti | शक्तीपीठ रद्दसह शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा : राजू शेट्टी यांचा रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा!

पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : उद्योजकांची कर्ज माफ करताना सरकारने जो न्याय लावला, तोच न्याय शेतकऱ्यांना लावून विनाअट सरसकट कर्जमाफी करावी. महाराष्ट्राच्या काहीही फायद्याची नसलेली बुलेट ट्रेन असो किंवा शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प रद्द करावेत. पण सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमूख माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पंढरपूरमध्ये आ. रोहित पवार यांचे सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला तिसऱ्या दिवशी शेतकरी नेते मा. खा. राजू शेट्टी यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी राजु शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मते घेताना देवेंद्र फडणवीस हे 7/12 कोरा... कोरा... कोरा... असे तीन वेळा म्हणाले होते. सातबारा कोरा करणे तर सोडाच पण आता विना निकष दोन लाख देखील शेतकऱ्यांना देत नाहीत. आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे तो अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही निकष न लावता संपूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज बनली आहे.

राजु शेट्टी पुढे म्हणाले की, सरकारने उद्योगपतींची एका झटक्यात 16 लाख कोटींची कर्जमाफी केली. त्यावेळी कोणते नियम लावले होते, असा सवाल उपस्थित केला. आणि शेतकरी कर्जमाफीसाठीच का नियम लावले जात आहेत. असा सवालही केला आहे. सरकारकडे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांचा विरोध असलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पैसे आहेत. मग शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी पैसे नाहीत का? पैसे नसतील तर शेतऱ्यांच्या फायद्याचा नसलेले बुलेट ट्रेन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

शेतकऱ्यांचा संघर्ष हा केवळ एका व्यक्तीचा, संघटनेचा किंवा कोणत्याही राजकारणासाठी नसून संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अन्नदात्याला न्याय मिळाल्याशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. या आंदोलनाकडे कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून बघु नये. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा हा लढा सुरु आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात, शहरात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर उतरु, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटात गेलेले बच्चू कडू यांना उद्देशून शेट्टी म्हणाले की, बच्चू कडू हे कोठेही असू द्या, त्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यावाच लागणार आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे सांगीतले.

दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा महाराष्ट्र पेटेल-

संपुर्ण कर्जमाफीबाबतचा निर्णय जून अखेर पर्यंत घेतला नाही तर या राज्यातील जनता फडणवीस आणि शिंदे सरकारला माफ करणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मते देवून खुर्चीवर बसवले. त्यांना वाऱ्यावर सोडू नका, ते तुम्हाला माफ करणार नाहीत. सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे बजेट वाढून 2029 च्या निवडणुकीसाठी पैशाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी पेटून उठला आहे.

सगळे लुटारु गुजरातचे

सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांचा विरोध असलेला शक्तीपीठ महामार्गाचे नेमलेले ठेकेदार हे गुजरातचे आहेत. त्यामुळे सगळे लुटारु हे गुजरातचे, त्यांना पोसण्याचे काम सरकार करत आहे. अगोदर पाणी पळवले. आता उद्योग पळवत आहेत. आणि बिचारे येथील शेतकऱ्यांना मात्र कजर्भरण्याचे काम करावे लागत आहे.अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT