पोखरापूर : फरशी बसविणारे राजस्थानमधील कारागीर मोहोळ तालुक्यातील ढोकबाभुळगाव येथे राहत होते. शनिवारी (दि.१६ मे) ते ढोकबाबळगाव येथील उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. अखेर त्यांचे मृतदेह रविवारी सकाळी सापडले. श्रीकांत रोहिदास चोपडा वय २५ व रविकांत हेमराज चोपडा - वय १९ अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील ढोकबाभुळगाव येथे राजस्थानमधील फरशी बसविणारे कारागीर राहण्यासाठी होते. शनिवार दि १६ रोजी दुपारी अडीच वा. श्रीकांत रोहिदास चोपडा व रविकांत हेमराज चोपडा दोघे (रा. बडावू, पो.खेतडा राजस्थान) हे चौधरी वस्तीजवळील उजनी डाव्या कालव्यात त्यांच्या अन्य दोघा साथीदारांसमवेत पोहण्यासाठी गेले होते.
अगोदर श्रीकांत चोपडा याने पाण्यात उडी मारली, तो बुडू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी रविकांत चोपडा याने पाण्यात उडी मारली. मात्र घाबरलेल्या श्रीकांतने रविकांतचा पाय घट्ट धरला, त्यामुळे दोघेही बुडाले. कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज दोघांनाही आला नाही. बराचवेळ ते दोघे वर येत नसल्याने त्यांचे साथीदार घाबरले. त्यांनी इतर नातेवाईकांना व पोलीस पाटील यांना ही घटना सांगितली. दरम्यान दुपारी अडीच वाजल्यापासून गावातील युवकांनी तसेच पट्टीच्या पोहणाऱ्यांनीही त्या दोघांना शोधण्याचा मोठा प्रयत्न केला, मात्र ते दोघे मिळून आले नाहीत. रात्र झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले.
दरम्यान रविवारी सकाळी दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळून आले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन करून ते दोन मृतदेह पोलीस प्रशासनाने त्यांच्या मूळ खेतडा जिल्हा झुंझुनू राजस्थान या गावी रवाना केले. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.