सोलापूर : उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. सुमारे अर्धातास वादळी वार्यासह पाऊस झाला. हवामान खात्याकडे 5.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.
यंदाच्या हंगामात मार्च महिन्यात तप्त ऊन जाणवत आहे. तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास कायम आहे. सोमवारी सकाळी उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण झालेे. त्यातच उकाड्याचे प्रमाण वाढले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरासह परिसरातील भागात वादळ वारे सुटून मेघगर्जना सुरू झाली. आकाशात विजाही चमकल्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला.
अक्कलकोट रोड, अशोक चौक, पाणी टाकी, कुंभार वेस मधला मारुती, विजापूर रोड, होटगी रोड, साखर करखाना, सैफूल, सात रस्ता, रंगभवन, पार्क चौक परिसरात पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना सुखद अनुभव आला. वादळी वार्यामुळे झाडावरील पाने, फांद्या तुटून पडल्या. अर्धा तासाच्या पावसाने वातावरण थंड झाले. परंतु सायंकाळनंतर पुन्हा वातावरणात उकाडा जाणवू लागला. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ, तडवळ, केगांव, आहेरवाडी, बंकलगीसह अन्य भागांत वादळी वार्यासह पाऊस पडल्याचे वृत्त आहे. सोमवारी पाऊस पडूनही 38.9 अंश सेल्सिअस तापमाने नोंदले गेले.