सांगोला : मध्य रेल्वेकडून येणार्या पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त सकाळच्या सत्रात 1 जुलैपासून गाडी क्रमांक 1107/08 मिरज-कलबुर्गी-मिरज दरम्यान स्पेशल 14 डब्यांची गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी मिरज येथून दररोज पहाटे 5 वाजता निघेल व कलबुर्गी येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. मिरज येथे रात्री 11.50 मिनिटांनी पोहोचेल.
सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली होती. मुंबई येथे झालेल्या मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रात कोल्हापूर -कलबुर्गी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी झाली होती. सदर गाडी कोल्हापूरमधून शक्य नसेल तर ती मिरजमधून सुरू करण्यात यावी. तेही शक्य नसेल तर मिरज-कुर्डूवाडी डेमोचा विस्तार कलबुर्गीपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन मिरज-कलबुर्गी-मिरज गाडी सुरू करण्यात येत आहे.
या गाडीस आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, गाणगापूर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी सुरू झाल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाबरोबर, सोलापूरचे सिद्धेश्वर, तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तसेच गाणगापूरचे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा होणार आहे.
मिरज-कलबुर्गी-मिरज या रेल्वेस रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रकात दोन तासाचे लूज मार्जिन ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे सदरहू रेल्वे मिरजेतून सकाळी 5 ऐवजी 7 वाजता सोडण्यात यावी. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल. सर्व थांबे दिल्याने प्रवासात समाधानाचे वातावरण आहे. ती कायमस्वरूपी करण्यात यावी. याकरिता रेल्वे विभागाकडे खासदार, डीआरयूसीसी सदस्य पाठपुरावा करत आहेत. तसेच प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन प्रतिसाद द्यावा.-निलकंठ शिंदे, अध्यक्ष-शहीद अशोक कामटे संघटना