सोलापूर : गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय वर्गणी गोळा केल्यास मंडळातील सदस्य कायदेशीर कार्यवाहीस पात्र असून, सदर कायदा नियमांचे उल्लंघन करणार्यास द्रव्यदंड व तुरुंगवासाची शिक्षा तरतूद आहे, अशी माहिती सोलापूर विभागाचे धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अंतर्गत कलम 41-क नुसार कोणतीही नोंदणी नसलेली व्यक्ती अथवा संस्था धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वर्गणी, देणगी अथवा मालमत्ता गोळा करत असल्यास, त्यांनी त्या वसुलीबाबत तत्काळ धर्मादाय आयुक्तांना कळविणे व परवानगी घेणे बंधनकारक आहे
वर्गणी घेण्यासाठी धर्मादाय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करुन परवानगी घ्यावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात परवानगी न घेताच लोकांकडून वर्गणी मागितली जाते.
मंडळातील सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र (आधार/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदान ओळखपत्र), जागेचा संमतीपत्र किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र, मंडळ स्थापनेचा ठराव, मागील वर्षाचा खर्चाचा हिशोब, 5 हजारपेक्षा जास्त जमा खर्च असल्यास लेखापरिक्षक अथवा सनदी लेखापालाचा अहवाल यासाठी आवश्यक.