Solar energy: सौर ऊर्जेत पुणे, सोलापूर, सातार्‍याची आघाडी Pudhari Photo
सोलापूर

Solar energy: सौर ऊर्जेत पुणे, सोलापूर, सातार्‍याची आघाडी

6 हजार 583 शेतकर्‍यांना मिळाली कृषी पंपासाठी दिवसा वीज

पुढारी वृत्तसेवा
संगमेश जेऊरे

सोलापूर : शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यात पुणे, सोलापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतील तीन सौरप्रकल्पांमुळे 6 हजार 583 शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर प्रकल्प योजना आहे. या योजनेतून पूर्ण झालेल्या बारामती परिमंडळातील व्याहळी जि. पुणे (10 मेगावॅट), मरियाची वाडी जि.सातारा (13 मेगावॅट), सांगोला जि.सोलापूर (10 मेगावॅट) या तीन सौर प्रकल्पांचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

2 हजार ग्राहकांना वीज

सांगोला, जि.सोलापूर येथे 32 एकर गायरान जमिनीवर 10 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही यलमार मंगेवाडी या उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. या उपकेंद्रावरील कमलापूर, यलमार मंगेवाडी, अजनाळे, लिगाडेवाडी, वाटबरे, बलवडी

या कृषीभारित 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील (फिडर) 07 गावांतील 2 हजार 96 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. यलमार मंगेवाडी, कमलापूर, अजनाळे, लिगाडेवाडी, वझरे, चिनके, सोनलवाडी या गावातील कृषी ग्राहक सांगोला सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.

2 हजार शेतकर्‍यांना लाभ

व्याहळी (ता. इंदापूर जि.पुणे) येथे 26 एकर गायरान जमिनीवर 10 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही शेळगाव या उपकेंद्राशी जोडण्यात आलेला आहे. या उपकेंद्रावरील कडबनवाडी, तेलओढा, नाझरकर, शिरसटवाडी, वीरझरा या कृषीभारीत 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील 14 गावे- वाड्यांतील 2 हजार 100 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. शेळगाव, तेलओढा, वैदवाडी, कडबनवाडी, शिरसटवाडी, हगारेवाडी, हनुमानवाडी, शिंगाडेवस्ती, पागळे वस्ती ननवरे वस्ती, भुजबळ वस्ती, राऊत वस्ती, गावडे वस्ती, खोमणे वस्ती या गावातील कृषी ग्राहक व्याहळी सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.

प्रकल्पामुळे मिळाली वीज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मरीआईची वाडी (ता.फलटण जि.सातारा) येथे 37 एकर गायरान जमिनीवर 13 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही लोणंद एमआयडीसी स्विचिंग स्टेशन या उपकेंद्राशी जोडण्यात आलेला आहे. या उपकेंद्रावरील अंधोरी व पिंपरे या कृषीभारित 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील (फिडर) 13 गावांतील 2 हजार 387 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. मरियाची वाडी, कराडवाडी, वाघोशी, अंदोरी, रुई, शेडगेवाडी, बाळूपाटीलची वाडी, बावकलवाडी, पाडेगाव खंडाळा, पाडेगाव फलटण, पिंपरे, डापकेघर, लोणंद या गावातील कृषी ग्राहक या सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT