सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रविवार (दि. 15) रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने खासदार राहुल गांधी, खा. प्रणिती शिंदे यांच्या व भाजप विरोधात पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी यांचा निषेध असो, गांधी-मोदी आरक्षणविरोधी, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आरक्षणावर निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा द्या, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेले.
काहीच दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे देशभरात भाजपसह अन्य पक्षाकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध पोस्टर हातील घेवून जोरदार निदर्शने करून खासदार राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला. तसेच विविध पोस्टर हाती घेवून अनोख्या पध्दतीने निषेध नोंदवला. भाजप व काँग्रेस हे आरक्षण विरोधी असल्याचे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वंचितचे महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हा युवक निरीक्षक इंद्रजीत घाटे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, अतिश बनसोडे, अनिरूध्द वाघमारे, प्रशांत गोणेवार, संजय हरिजन, विक्रम गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले असून, हे निषेधार्ह वक्तव्य आहे. राखीव जागेवर निवडून आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी याचा जाब आपल्या नेत्यांना विचारला पाहिजे. खा. शिंदे यांनी नैतिकता पाळून खासदारकीचा राजीनामा द्यावा. गांधी-मोदी आरक्षण विरोधी आहेत हा नारा आम्ही दिला आहे. आरक्षण संपवण्याचा जे काम करीत आहेत त्यांची जागा विधानसभेला दाखवू.- अतिष बनसोडे, वंचित बहुजन आघाडी.