अमोल साळुंके
सोलापूर : राज्यातील विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात प्राध्यापकांच्या बारा हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. प्राध्यापक भरतीमधील त्रुटी दूर झाल्या आहेत. मात्र, प्रारंभी राज्यातील विविध विद्यापीठातील एक हजार 200 प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. उर्वरित एक हजार 400 रिक्त पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. त्यामुळे पीएचडी, नेट, सेट झालेल्या प्राध्यापकांना शासकीय नोकरीत संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) राज्याच्या कामगिरीमध्ये घसरण झाल्यानंतर आता शासकीय अकृषि विद्यापीठांतील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया मार्गी लावण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विद्यापीठांमध्ये अध्यापक पदाच्या सुमारे दोन हजार 600 मंजूर जागांपैकी एक हजार 200 हून अधिक जागा रिक्त आहेत. रिक्त जागांपैकी 40 टक्के जागा भरण्यास दोन वर्षांपूर्वीच मान्यता दिली होती. मात्र, पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी स्वतंत्र आयोगाद्वारे भरती करण्याची तत्कालीन राज्यपालांची भूमिका, तसेच अन्य तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया रखडली. राज्यपाल कार्यालयाने तरतुदींमध्ये सुधारणा करून नवा निर्णय प्रसिद्ध केले आहे.
तब्बल 12 हजार पदे रिक्त
राज्यातील सार्वजनिक 11 विद्यापीठे आणि 1 हजार 172 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 33 हजार 763 प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील 21 हजार 236 पदांवर प्राध्यापक कार्यरत असून, तब्बल 12 हजार 527 जागा रिक्त आहेत. त्यातील प्रारंभी विद्यापीठातील रिक्त असलेल्या दोन हजार 600 जागापैकी 1200 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे.
लवकरच रिक्त पदे भरली जाणार
राज्यात विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात एकूण 12 हजारांपेक्षा जास्त प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राध्यापकांची 80 टक्के पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जवळपास 10 हजार प्राध्यापकांची पुढील काळात पदे भरली जातील. तसेच विद्यापीठातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, विद्यापीठातील रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पवित्र शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.