संतप्त परिवहनमंत्र्यांनी केले आगारप्रमुखांना निलंबित (Pudhari File Photo)
सोलापूर

Pratap Sarnayak | संतप्त परिवहनमंत्र्यांनी केले आगारप्रमुखांना निलंबित

आठवड्यापूर्वी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देऊन तेथील गैरव्यवस्थापनाबद्दल विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुखांना चांगलेच खडसावले होते.

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरच्या बसस्थानकावर सर्वत्र मुतारीची दुर्गंधी, घाणेरडे फलाट, पाणपोयीचीही तीच अवस्था, थुंकून सर्वत्र झालेली घाण अशा अत्यंत वाईट अवस्थेमुळे संतापलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ विभाग नियंत्रक गोंजारी आणि आगारप्रमुख जोंधळे यांना जाब विचारला आणि संतप्त स्वरात विचारले निलंबित कोणाला करायचे ते सांगा. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच तत्काळ निर्णय घेत वरिष्ठ आगारप्रमुख उत्तम जोंधळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

आठवड्यापूर्वी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देऊन तेथील गैरव्यवस्थापनाबद्दल विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुखांना चांगलेच खडसावले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा मंत्र्यांचा दौरा असल्याची माहिती मिळाल्याने गुरुवारीच एसटी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची आगारात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आणण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली होती. मंत्री सरनाईक यांच्या आगमनाची एसटी अधिकारी आणि कार्यकर्ते वर्ग आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, शुक्रवारी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी मंत्री सरनाईक हे सोलापूर बसस्थानक येथे पोहोचले. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट पाहणी सुरू केली. पाहणी दरम्यान मंत्री सरनाईकांना पुन्हा पूर्वीसारखेच चित्र दिसल्याने संतप्त मंत्र्यांनी आगारप्रमुखांना तडकाफडकी निलंबीत केले.

फळ विक्रेत्यांवरही सरनाईकांचे लक्ष

पाहणीदरम्यान मंत्री सरनाईकांना आगारात 8-10 फळ विक्रेते दिसले. त्यांना पाहून ते म्हणाले, येथे बस येतात आणि जातात. तुम्ही बस येण्या-जाण्याच्या रस्त्यावर बसल्यास अपघाताची शक्यता आहे, असे सांगत त्यांनी तेथून अन्यत्र व्यवसाय करण्यास सांगितले.

फलाट नऊवर थुंकल्याने मंत्री संतापले

फलाट क्रमांक नऊच्या पाहणीदरम्यान प्रवासी थुंकलेले आणि घाण झालेले खांब पाहून मंत्री सरनाईक संतापले. गर्दीमुळे अधिकारी मागे राहिल्याने त्यांनी मोठ्याने ओरडून ‘कुठे आहेत अधिकारी, या समोर या’ असे सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT