सोलापूर : केंद्र शासनाच्या धुळमुुक्त योजनेतून विकासकामांसाठी 40 कोटी निधीतून खा. प्रणिती शिंदे यांची कामे वगळण्यात आली. त्यामुळे खा. शिंदेनी आक्रमक होत महापालिका आयुुक्तांसह सर्व अधिकारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. खा. शिंदे यांनी आयुुक्तांसह इतर अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले. दरम्यान, आयुक्तांनी ही परिस्थिती संयमाने हाताळत खा. शिंदे यांच्या कामांविषयी सकारात्मक भूमिका घेतल्याने तणाव निवळला.
शुक्रवारी (दि. 12) खा. प्रणिती शिंदे यांनी शहरातील पावसाचे पाणी शिरलेल्या भागाची पाहणी करून आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेतली. खा. शिंदे यांनी विकासकामांची यादी महापालिका प्रशासनास दिली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने भाजपाच्या तीन आमदारांनी सुचवलेल्या विकासकामांना प्रधान्य दिले. त्यामुळे खा. शिंदे यांनी आयुक्तांसमोर टेबलवर जोराने हात आपटत जाब विचारला. त्या म्हणाल्या, विकासकामांच्या यादीविषयी वारंवार पाठपुरावा केला. वेळोवेळी पत्रे दिली. आयुक्तांनाही कल्पना दिली.
तरीदेखील मी सुचवलेली कामे डावलली. केंद्राचे निधीचे समान वाटप केले पाहिजे. मात्र, आयुुक्तांसह अधिकार्यांवर भाजपच्या पालकमंत्र्यांचा आणि आमदारांचा दबाव आहे. त्या दबावाखालीच त्यांनी कामांची अंतिम यादी तयार केली. उपसमितीमध्येही त्यास बेकायदा मान्यता दिली. या विकासकामांचा मक्ता रद्द करत नवीन निविदा काढा. सर्वांच्या कामांचा समावेश त्यामध्ये करा, त्याशिवाय येथून उठणार नाही, असा पवित्रा खा. शिंदे यांनी घेतला.
अधिकारी आमच्या मुुळावर उठले
ज्या अधिकार्यांना आम्ही मोठे केले. तेच आमच्या मुुळावर उठले. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि नगरअभियंता सारिका अंकुलवार यांचे नाव घेऊन खा. शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आयुक्तांचे ठोस आश्वासन
यादीमध्ये बदल केला तर मी अडचणीत येईन. अद्याप निविदा खुली केली नाही. त्याला वेळ आहे. दोन दिवसात आपल्या कामांचा यामध्ये समावेश करता येतो का ते पाहून तसे करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. ओंबासे यांनी दिले.