सोलापूर ः भोंदू अशोक खरातकडे अनेक नेत्यांच्या काळ्या कारभाराचे पुरावे आहेत. ते बाहेर आल्यानंतर नेत्यांची पोलखोल होईल. त्यामुळे आपले अस्तित्व वाचवण्यासाठी राजकीय नेते पोलिसांच्या माध्यमातून भोंदू खरातचा एन्कांऊटर करतील, अशी भीती खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
खा. शिंदे यांनी मंगळवारी (दि. 14) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. संविधान जपण्याचा संकल्प करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. सत्ताधारी भाजपकडून संविधानाचा वारंवार अपमान होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली त्यांच्यासाठी मात्र आता देशासाठी लढण्याची वेळ आली आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून, लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी जात-पात, धर्म बाजूला ठेवून संघटित संघर्ष करणे आवश्यक आहे. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती होती.