सोलापूर

Praniti Shinde: म्हैसाळ योजना, उजनीचे पाणी सोडण्याची मागणी

मंगळवेढा तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी खा. प्रणिती शिंदेंचा आक्रमक पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण दुष्काळी पट्ट्यातील पाणीटंचाई आणि खरीप पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर खा. प्रणिती शिंदे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी खा. शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या आक्रमक मागणीसाठी आणि पाठपुराव्यासाठी खा. प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व धनश्री परिवाराचे नेते शिवाजीराव काळुंगे, जकराया शुगरचे अध्यक्ष बिराप्पा जाधव, मंगळवेढा काँग्रेस शहराध्यक्ष राहुल घुले, युवराज गडदे, अमोल रणदिवे, सीताराम रणदिवे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे आदी उपस्थित होते.

खा. शिंदे यांनी जलसंपदा मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा देणारी आग्रही मागणी केली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यापर्यंत सोडण्यात आले आहे. तेथून पुढे ते मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

या योजनेतून मंगळवेढा तालुक्यासाठी मंजूर असलेल्या वितरिका क्रमांक १, २ व उमदी वितरिका या माध्यमातून तत्काळ पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून भोसे, हुन्नूर, शिरनांदगी, मारोळी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्द, लवंगी, येळगी, सोड्डी, शिवणगी आणि आसबेवाडी या गावांना सिंचन व पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

चालू खरीप हंगामामध्ये मंगळवेढ्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे तालुक्यातील उभी पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीचा विचार करता, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळून खाक होण्यापासून वाचवण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्र, उजव्या व डाव्या कालव्यामध्ये तत्काळ पाणी सोडण्यात यावे. पाणी सोडण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन चारा व पाणी टंचाईची भीषण परिस्थिती उद्भवेल, असा इशारा खासदार शिंदे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT