Pandharpur Vitthal Temple Pudhari
सोलापूर

Pandharpur News : पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईची प्रक्षाळपूजा

नित्योपचार सुरू; शिणवटा घालविण्यासाठी आयुर्वेदिक काढा

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचा शिणवटा, थकवा घालविण्यासाठी शेजारतीवेळी नैवेद्य म्हणून आयुर्वेदिक काढा दाखविण्यात आला. आजपासून श्री विठ्ठलास व रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार देवाचे राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. सोमवारी (दि. ३) श्री विठ्ठलाची मंदिर समिती सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाली.

प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले. याप्रसंगी सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, विभागप्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहायक विभागप्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे उपस्थित होते. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. तसेच संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रांमध्ये सुमारे दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT