Electricity bill deadline: मुदतीत लाईट बिल न भरल्यास बत्ती होणार गुल Pudhari
सोलापूर

Electricity bill deadline: मुदतीत लाईट बिल न भरल्यास बत्ती होणार गुल

ग्राहकांचा विद्युत पुरवठा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिमोट पद्धतीने खंडित केला जाणार

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकीदारांच्या विरोधात ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू केली आहे. यामुळे थकीत वीजबिल भरायला विलंब करणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिमोट पद्धतीने खंडित केला जात आहे. यामध्ये आजअखेर 192 थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, दि. 20 फेब्रुवारीपासून रिमोट ऑपरेशन मोहीम राज्यभरात यामध्ये सांगोला तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर अंमलात आणण्यात आली आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी थकबाकीची रक्कम निश्चित कालावधीत भरली नाही. तर, संगणक प्रणालीद्वारे वीज जोडणी बंद केली जात आहे.

दरम्यान, सांगोला अंतर्गत 28 हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. तर हातीद अंतर्गत 19 हजार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. तालुक्यातील दोन सबस्टेशन अंतर्गत 47 हजार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मार्ट मीटर बसवण्याचे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असून, स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, सांगोला व हातीद या दोन्ही उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयात देखील स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये थकित बिलाची नोंद होताच संबंधित ग्राहकाला एसएमएसद्वारे सूचना दिली जाते. बिलाची अंतिम मुदत उलटल्यानंतरही रक्कम न भरल्यास प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित केला जातो. तशी यंत्रणा त्यात बसविण्यात आली आहे. थकबाकी भरल्यानंतर रिमोट पद्धतीने पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जातो. या प्रणालीमुळे मनुष्यबळ वेळ व श्रम वाचणार असून, थकबाकी नियंत्रणात येण्यास मदत होणार असल्याचे सांगोला महावितरणकडून सांगण्यात आले.

स्मार्ट मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट आहे. त्यामुळे या मीटरमध्ये छेडछाडीचे प्रकार (टॅम्परिंग इव्हेंट) घडल्यास त्याची माहिती लागलीच महावितरणच्या सर्व्हरला कळते. या सर्व्हरवर 24 तास लक्ष ठेवले जाते. या तंत्रज्ञानामुळे वीज चोरांना चाप बसण्यास मदत झाली आहे. वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर ही आधुनिक प्रणाली असून, अचूक बिलिंगमुळे ग्राहक आणि महावितरण दोघांनाही फायदा होणार आहे. दिवसाच्या वीज वापरावर घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

लाईट बिल मुदतीत न भरल्यास यापूर्वी वीज कनेक्शन कट करून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात होता. परंतु आता स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयाकडूनच थकबाकी असलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा रिमोटच्या साह्याने बंद होतो. सदर थकबाकीदार ग्राहकांनी वीज वापराचे पैसे भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा 15 मिनिटात ते 4 तासाच्या आत पूर्ववत सुरू होतो. वीज ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवावा.
- गणेश पोवार, उप अभियंता महावितरण कार्यालय सांगोला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT