पोखरापूर : पोलिस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गावरील दुचाकीस्वारांची अपघातांची मालिका थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करत असताना दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल करणार्या सावळेश्वर टोल कंपनी मात्र महामार्गाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहे.
मोहोळपासून यावली, हिवरे, चिखली गावापर्यंत सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्ट्यालगत मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. रस्त्यालगतच्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सुरू असलेली अपघातांची मालिका कोण थांबवणार? असा संतप्त सवाल वाहनचालकांमधून विचारला जातोय.
मोहोळ तालुक्याची हद्द सुरू होणार्या शेटफळ गावापासून ते पाकणीपर्यंत सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गाला कोणत्याही प्रकारे सर्व्हिस रस्ता नाही. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर दुसरीकडे हजारो लोक जखमी झाले आहेत. वाहनांना येण्या-जाण्यासाठी अपूर्ण मार्ग असल्याकारणाने अडचण निर्माण होत आहे. साईडपट्ट्या नसल्याकारणाने ठिकठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. रस्त्याला साईडपट्ट्या करण्यात याव्यात, तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत आदी मागण्या नागरिकांनी, वाहनचालकांनी वारंवार केल्या.
वरवडे ते सावळेश्वर टोल नाका या दोन टोलनाक्यांमध्ये जवळपास 55 किलोमीटरचे अंतर असून दोन्ही टोलनाक्याच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची वाहनचालकांकडून वसुली होते. प्रत्यक्षात मात्र त्या वाहनचालकांना रस्त्यांवरचे, साईड पट्ट्यालगतचे खड्डे यातून धोकादायकरित्या मार्ग काढण्याची वेळ आली आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यालगत आधार म्हणून लावण्यात येत असलेला मुरूम न लावल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणचे खड्डे रिकामे झाले असून रात्री अंधारात दुचाकी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
शुक्रवारी रात्री यावली गावच्या हद्दीतील मेवाड धाब्यासमोर मोहोळकडून हिवरेकडे निघालेल्या दुचाकीस्वाराचा रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्याने अपघात झाला. त्यामध्ये तो दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. सर्व्हिस रस्ता नाही तर नाही, किमान साईड पट्ट्यालगत पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जाते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे महामार्गालगतचे खड्डे बुजविण्यासंदर्भात मागणी केली आहे. खड्डे लवकर नाही बुजविले तर सावळेश्वर टोल प्लाझाच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करणार.- किशोर पवार, मोहोळ शहराध्यक्ष, काँग्रेस आय
मुरुमाच्या रॉयल्टीची प्रक्रिया पूर्ण केली असून ठेकेदारामार्फत लवकरात लवकर साईड पट्ट्यालगत जिथे जिथे खड्डे आहेत, त्याठिकाणी मुरूम टाकून वाहन चालकांची सोय करण्याचा प्रयत्न आहे.- दशरथ भोसले, सावळेश्वर टोल प्लाझा