सोलापूर : भारतीय पोस्ट विभागाने धाडसी निर्णय घेतला असून ज्या-ज्या नागरी वसाहतीत पोस्टाचे कार्यालय नाही, अशा ठिकाणी सुशिक्षित बेकार तरूणांना फ्रँचायझी देणार आहेत. या फ्रँचायझीच्या माध्यमातून पोस्ट विभागाच्या बँकींग, टपाल, पार्सल आणि विम्यासह अन्य सर्व पोस्ट विभागाच्या सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत. ज्या तरूण व तरूणींना फ्रँचायझी देण्यात येणार आहे, अशांना या नव्या फ्रँचायझीमुळे सुशिक्षित तरूण व तरूणींच्या हाताला सहज व शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे.
पोष्ट विभागाने देशभरात शहर आणि ग्रामीण भागात फ्रँचायझी देऊन पोस्टाच्या सेवा जास्तीत जास्त नागरिकांच्या दारात नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फ्रँचायझीचा फायदा हा ज्येष्ठ, वयोवृध्द आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या फ्रँचायझीच्या माध्यमातून पोस्ट विभागाच्या रजिष्टरसह सर्व प्रकारच्या टपाल सेवा, मासिक व बचत खात्याच्या बँकींग सेवेसह विमा योजनेच्या सर्व सुविधा मिळणार आहेत. येथे विविध पार्सलचीही सोय असतील. शिवाय, देशांतर्गत आणि परदेशात पाठवले जाणारे पत्र किंवा आप्तेष्ट आणि नातेवाईकांना दिवाळीसाठीचा फराळ पाठवण्यासाठी यापुढील काळात पोस्टाच्या कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. ही फ्रँचायझी शहर व ग्रामीण भागात अशा दोन्ही ठिकाणी दिली जाणार आहे.
ज्याठिकाणी पोस्टाचे कार्यालय आहे. तेथेही फ्रँचायझी दिली जाईल. तसेच, दुर्गम भागातील तरूणांनाही फ्रँचायझी दिली जाणार आहे. फ्रँचायझी घेण्यासाठी पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांचे निकटवर्तीय कुटुंब पात्र असणार नाहीत. त्यांच्यासाठी पोस्टविभागाकडून ही अट घातली आहे. या अटीची पूर्तता केल्यास कामाच्या शोधातील तरूणांच्या हाताला शाश्वत काम उपलब्ध होणार आहे. फ्रँचायझी घेण्यासाठी स्वतःची 50 चौरस मीटर जागा आवश्यक असणार आहे. शिवाय संगणक, स्मार्ट फोन, इंटरनेट, प्रिंटर, वजनकाटा, बारकोड, स्कॅनर आदी स्वतः च्या मालकीचे असणे आवश्यक आहे.