Jaykumar Gore  pudhari photo
सोलापूर

Jaykumar gore: सोलापूर जिल्ह्याला 842 कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती; विकासाला गती मिळणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून 100 टक्के निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी निधी मंजूर आहे. या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे हाती घेता येतील, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

महाराष्ट्रदिनी सोलापुरात ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राने सन 2025-26 मध्ये उल्लेखनिय प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा मोठा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 4 लाख 86 हजार लाभार्थ्यांना 97 कोटी 39 लाख रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. तसेच यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक व समप्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे गोरे यांनी सांगितले.

सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग

सध्या मुंबई, गोवा याठिकाणी विमानसेवा सुरू झाली असून नजीकच्या काळात तिरुपती, हैदराबाद व पुणे या सेवा सुरू होतील. यामुळे सोलापूरमधील उद्योग व्यवसायास चालना मिळाली आहे. भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

आयटी पार्कमुळे युवकांना मिळणार रोजगार

सोलापूर येथील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर कॉरिडॉर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. अयोध्या, काशी विश्वेश्वर, उज्जैन यासारखी धार्मिक स्थळे जशी विकसित होत आहेत, त्याधर्तीवर विठूरायाची पंढरी नगरीचा विकास व्हावा, हीच भावना या आराखड्यामध्ये आहे. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांचे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने स्वतःच्या मालकीची 15 एकर जागा उपलब्ध करुन दिली आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांचे अरण येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने 150 कोटी निधीचा आराखडा मंजूर केला असून त्यापैकी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT