सोलापूर : पोषण आहार योजनेच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती केली होती. त्या पथकाने साडे हायस्कूल, साडे (ता. करमाळा) येथील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत गंभीर अनियमितता असल्याचा अहवाल दिला होता. तसे पत्र प्राथमिक शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहे. मात्र, माध्यमिक शिक्षण विभागाकडून अद्यापही त्या शाळेवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्या शाळेवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
भरारी पथकाने साडे हायस्कूल, साडे (ता. करमाळा) येथे दिलेल्या भेटीत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील गंभीर अनियमितता असल्याचे तपासणीत उघडकीस आले. संबंधित प्रकरणाचे निष्कर्ष शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कळवले आहे. पत्रानुसार शाळेचे प्रभारी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या वितरणात, नोंदवहीत व उपस्थिती पडताळणीत गंभीर त्रुटी केल्याचे भरारी पथकाने नोंदवले आहे. या अनियमिततेबाबत शाळेकडून खुलासा मागवण्यात आला होता. प्राप्त खुलासा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा झाले आहे.
मात्र, तो समाधानकारक नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित प्रभारी मुख्याध्यापकांकडून जबाबदारी निश्चित करून तातडीने प्रशासकीय कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही, या प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
भरारी पथकाकडून पोषण आहाराची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अनियमतता असल्याचे पत्र प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहे. त्या अनुंषगाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक