सांगोला : अंबिया बहरामधील डाळिंबासाठी विमा योजना राबवण्यात येणार आहे. डाळिंब फळबाग विमा योजनेत दोन वर्ष वय पूर्ण असलेल्या डाळिंब बागेस विमा कंपनी मार्फत प्रति हेक्टर 1 लाख 60 हजार रुपये विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे. 14 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आल्याची माहिती सांगोला कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.
डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकरी पुन्हा डाळिंब लागवडीकडे जोमाने वळला आहे. दररोज नव्याने डाळिंबाची लागवड होत आहे. येत्या काळात गारपीट व हवामान धोक्यापासून डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, म्हणून शासन स्तरावरून विमा योजना राबवली जात आहे. यामध्ये प्रती हेक्टरी 1 लाख 60 हजार रुपये संरक्षित रक्कम देण्यात येणार असल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
डाळिंब पिकासाठी सांगोला तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या तालुक्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 8 हजार ते 20 हजार रुपये प्रति हेक्टर असणार आहे. गारपिटीपासून 15 जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत कालावधीसाठी विमा संरक्षित रक्कम 53 हजार रुपये प्रति हेक्टरसाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता 2,650 रुपये प्रति हेक्टर इतका असणार आहे.
गारपिटीमुळे नुकसान झाल्यास नुकसानीबाबत संबंधित विमा कंपनीला घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत सूचना देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता 35 टक्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील 50 टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीटेक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब पिकासाठी मृग बहर 2025 मध्ये सहभाग घेतला आहे, त्यांना त्याच क्षेत्रासाठी आंबिया बहरामध्ये विमा संरक्षण घेता येणार नाही. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टलवर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅकनोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा 7/12, 8 (अ) उतारा आणि पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील. एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
सदर फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी ई -पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे. असेही सांगोला कृषी विभागा मार्फत सांगण्यात आले आहे.