सोलापूर : चिंचोली काटी येथील केमिकल कंपन्यांमुळे या परिसरातील शेतजमीन नापीक झाली आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी तसेच जमीन सुपीक करून द्यावी, या मागणीसाठी येथील नुकसानग्रस्त शेतकरी चिंचोली एमआयडीसी कार्यालयासमोर सोमवार, दि. 4 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी किसन धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे केमिकल कंपन्या मोठ्या संख्येने आहेत. या कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी या शिवारातील सर्व शेत जमिनीत मुरते. यामुळे येथील शेत जमिनी नापीक झाल्या आहेत. टँकरद्वारेही या कंपन्या परिसरात खड्ड्यांमध्ये हे केमिकलचे पाणी सोडतात. ते पाणी विहिरीमध्ये, बोअरमध्ये पाझरते. पिण्यायोग्य पाणी राहिले नाही. यामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. याला चिंचोली एमआयडीसी जबाबदार आहे. त्यामुळे या एमआयडीसीने शेतकर्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी.
शेतजमीन सुपीक करून द्यावी, या मागणीसाठी चिंचोली एमआयडीसी कार्यालयासमोर येत्या सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही न्याय न मिळाल्यास मुंबई मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही किसन धोत्रे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेस उद्धव भोसले, विक्रम धोत्रे, शिवाजी परीट, सरफोद्दीन शेख, कैलास कोळी उपस्थित होते.