Solapur Municipal Elections Pudhari Photo
सोलापूर

Solapur mayor: सोलापूर महापौरपदासाठी राजकीय रस्सीखेच शिगेला

कागदपत्र करून घेतली जमा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सध्या जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या तीन प्रमुख नेत्यांच्या समर्थकांमध्ये संख्याबळाची चुरस रंगली आहे. कोणाकडे जास्त नगरसेवक, त्याच गटाचा महापौर हे पारंपरिक राजकीय गणित सध्या सोलापुरात लागू होताना दिसत आहे.

दरम्यान, भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या गॅटवर सह्या घेण्यात आल्या असून आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो जमा करून घेतले आहे. 28 जानेवारीला सर्व नगरसेवकांचे वऱ्हाड पुण्याला रवाना होणार आहे. तोपर्यंत सर्व नगरसेवकांनी सोलापूर न सोडण्याचे आदेश भाजप शहराध्यक्षांनी काढले आहेत.

आमदार देवेंद्र कोठे गटाकडे एकूण 41 नगरसेवकांचे पाठबळ असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे माजी आमदार सुभाष देशमुख यांचे 18, तर आमदार विजयकुमार देशमुख यांचे 28 नगरसेवक समर्थक आहेत. त्यामुळे दोन्ही देशमुख गट एकत्र आल्यास त्यांची एकत्रित संख्या तब्बल 46 होते. या संख्याबळामुळे महापौरपद देशमुख गटाकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

देशमुख गटाकडून महापौरपदासाठी डॉ. किरण देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आहे. त्यांना दोन्ही देशमुख गटांचा स्वीकारार्ह चेहरा मानले जात असून संख्या आमची, महापौर आमचा, असा सूर या गटातून लावला जात आहे. मात्र आमदार देवेंद्र कोठे गटही माघार घ्यायला तयार नसून त्यांच्या गटाकडून विनायक कोंड्याल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोठे समर्थकांकडून महापौरपद आपल्यालाच मिळावे यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.एकूणच सोलापूर महापौरपदाची लढत आता निर्णायक टप्प्यात आली असून देवेंद्र कोठे समर्थक विनायक कोंडयाल आणि देशमुख समर्थक डॉ. किरण देशमुख, अनंत जाधव यांच्यातच मुख्य रस्सीखेच रंगली आहे. अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 23 जानेवारी रोजी भाजप कार्यालयात नूतन नगरसेवकांची बैठक झाली या बैठकीत नगरसेवकांची गॅझेटवर सह्या घेण्यात आल्या.आधार कार्ड, पॅन कॉर्ड, प्रमाणपत्र जमा करून घेण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी पुणे येथे सर्व निर्वाचित नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे परिस्थितीचा आढावा घेणार असून त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे नगरसेवकांची कागदपत्रे सुपूर्त करून गॅझेट अधिसूचनेसाठी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तो पर्यंत सर्व नगरसेवकांनी सोलापूर न सोडण्याचे आदेश शहराध्यक्ष रोहणी तडवळकर यांनी नगरसेवकांना दिले आहेत.

महापालिका प्रशासनाकडून महापौर निवडीच्या हालचालीला वेग आला आहे. नगरसचिव कार्यालयाकडून विभागिय आयुक्तांना पत्र पाठवत महापौर निवडी संदर्भात तारिख आणि इतर प्रक्रिये बाबत मार्गदर्शन मागितले आहे. विभागीय आयुक्त महापौर निवडीच्ाा कार्यक्रम कधी जाहीर करणार यांकडे देखिल सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT