पोखरापुर: दोन कार मधून दरोड्याच्या तयारी आलेल्या ९ जणांना मोहोळ पोलिसांच्या गस्त पथकाने अत्यंत शिताफिने पकडून त्यांच्याकडून दोन कार, तीन तलवारी, लोखंडी टॉमी, सुरा अशी घातक हत्यारे जप्त केल्याची केली. ही कारवाई पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावच्या हद्दीत १० नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी १८ लाख रुपये किमतीच्या दोन कार व २५०० रुपये किमतीची घातक शस्त्रे जप्त केली आहेत. पकडलेल्या नऊ संशयित आरोपींना मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस शिपाई सिद्धनाथ मोरे, अमोल जगताप, संदीप सावंत असे पथक १० नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सावळेश्वर गावच्या हद्दीत गस्त घालत असताना कर्णेवाल हॉटेलच्या पुढे काही अंतरावर कार क्रमांक एम. एच.११, डी.ए. ९२८१ व एम. एच.४५ ए. यु.८२२२ या कार मधील काही लोक संशयीतरित्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पाहत असल्याचे दिसले.
पोलिसांच्या पथकाचा संशय बळवल्याने त्यांच्याजवळ गेले असता कारच्या बाहेरील लोक पोलीस गाडी पाहून पळून जावू लागले. त्यांना तात्काळ पोलिसांच्या पथकाने पकडले. तसेच कारच्या आत मध्ये असलेले पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले. त्यांची नावे अशी निलेश धन्यकुमार घुगे रा. मु. पो. भेंड, ता. माढा, जि. सोलापूर, नितीन अंकुश जगदाळे रा. भवानी माता नगर, उंब्रज, ता. कराड जि. सातारा, नितीन भारत पडळकर रा. शिक्षक कॉलनी म्हसवड ता. मान जि. सातारा, दिनेश धनाजी मुळे रा. खंडाळी ता. मोहोळ, किल्लो गुरु अर्जुन रा. अल्लूर, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भूषण गणपतराव जाधव रा. मोडनिंब ता. माढा, अजिंक्य उर्फ ओंकार दत्तात्रय गव्हाणे व पवन भीमराव कोळी दोघे रा. कुर्डूवाडी ता. माढा , मारुती चंद्रकांत भोर रा. कोळविहिरी ता. पुरंदर जि. पुणे. त्यांच्याकडे पोलिसांच्या पथकाने येथे काय करत आहे याबाबत विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तर देऊ लागले. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्याबद्दलचा अधिकच संशय वाढला. त्या ठिकाणी असलेल्या पोलीस पथकाने तात्काळ पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना संपर्क करून बोलावून घेतले. पोलिसांच्या पथकाने कारच्या डिकी उघडून पाहिले असता त्यामध्ये हत्यार आढळून आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या कार मधील तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, येणाऱ्या जाणाऱ्या वाहना पैकी एखाद्या वाहनास अडवून त्यांच्याकडून पैसे, मौल्यवान वस्तू काढून घेण्यासाठी थांबलो होतो. मात्र मोहोळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.