श्रीपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस 75 दिवसात गाळप केले. कमी दिवसात जास्तीचा ऊस गाळप करण्याचा उच्चांक निर्माण केला आहे. या हंगामात दि. 31 डिसेंबर अखेर गाळप झालेल्या सर्व ऊस उत्पादकांच्या उसास प्रति मे.टन रु.3,000 प्रमाणे ऊस बिलाची एकूण रक्कम रु.170 कोटी अदा केली आहे.
कारखान्याचे चेअरमन मा.आ. प्रशांतराव परिचारक (मालक), व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी, कामगार यांच्या सहकार्याने कारखाना सुरळीत व विनाखंड चालू आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
गळीत हंगामामध्ये कारखान्याकडे सुमारे 11 लाख मे.टन ऊस क्षेत्राच्या नोंदी झाल्या होत्या. त्यामधील कारखान्याने आजपर्यंत 7 लाख मे.टन ऊस गाळप केला आहे. त्याचबरोबर यावर्षी गाळपास येणाऱ्या उसास प्रति मे.टन रक्कम रु.3000 प्रमाणे ऊस बिलाची रक्कम दिली आहे. पहिल्या पंधरवड्यातील राहिलेल्या ऊस बिलाच्या, फरकाची रक्कमही अदा केली आहे. याचबरोबर कारखान्याकडे तोडणी वाहतूक करणाऱ्या तोडणी वाहतूक ठेकेदारांचीही बिले दिली आहेत. या हंगामात कारखान्याने 6,40,000 क्विं. साखर उत्पादन करुन 10.70 टक्के सरासरी साखर उतारा मिळविला आहे.
को-जनरेशनमधूनही 4.22 कोटी वीजनिर्मिती करुन 2.20 कोटी वीज निर्यात केली आहे. आसवणी प्रकल्पामधूनही 67 लाख लिटर इतके उत्पादन घेतले आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले की, स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी ज्याप्रमाणे ‘शेतकरी हिताय, कामगार सुखाय’ हा मूलमंत्र जपला. त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण सभासद शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्य करीत आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ऊस गाळपास राखुन ठेवून कारखान्यास उसाचा पुरवठा करावा.