Solapur ZP Pudhari
सोलापूर

Solapur ZP: जिल्हा परिषद वारकऱ्यांना सुविधा पुरवणार

६१ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात येणार; पालखी मार्गावर दहा हजार वृक्ष लागवड

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाणी टँकर, औषधोपचार, महिला स्नानगृह, फिरते शौचालय, मोबाईल चार्जिंग व्हॅन यासह इतर कामांसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत ६१ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. यापैकी सध्या २२ कोटी रुपये शासनाकडून मिळाले. या निविदेला मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा गुरुवारी पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण, आरोग्य सभापती केदार सावंत, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, महिला बालकल्याण सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विभागप्रमुख, सर्व जि. प. सदस्य उपस्थित होते.

सदस्य अतुल पवार व चरणराज चवरे यांनी सांगोला, मोहोळ, माढा तालुक्यातून येणाऱ्या पालखी मार्गावरील वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने सुविधा पुरवाव्यात, असे सांगितले. तर लक्ष्मी टाकळी गावाला पाच लाखांऐवजी १२ लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी सदस्य वाघमारे यांनी केली. व्यंकट भालके यांनी यात्रा कालावधीत पंढरपुरातील खासगी डॉक्टर बाहेरगावी जातात, असे सांगितले. त्यावर खासगी डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये थांबण्याबाबत सुचनेचा ठराव घेण्यात आला.

दहा मानाच्या पालख्यांचे ३८ मुक्काम

दहा मानाच्या पालखी सोहळ्यांचे सोलापूर जिल्ह्यात एकूण ८१ गावांत ३८ मुक्काम तर ४३ विसावे तसेच सात रिंगण सोहळे होणार आहेत. पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना ५००० तात्पुरते शौचालय २३ जर्मन हंगर व ३७ वॉटरप्रूफ मंडप, १६७ हिरकणी कक्षा, ४० स्वागत कमान, २२० टँकर, ५०० स्नानगृह, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, १३ मुख्यमंत्री आरोग्य रथ, ७५० चरण सेवा फूट मसाजर उपलब्धता करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील जिल्ह्यात एकूण २३ स्वागत कमान उभारण्यात येणार आहेत.

महिलांसाठी हिरकणी कक्ष

हिरकणी कक्षात महिलांसाठी बेड सॅनिटरी, पॅड, खुर्ची, पिण्याचे पाणी, लाईट, पंखे, कचरापेटी सेंट्रल पॅड वेंडिंग मशिन व डिस्पोझर मशिन उपलब्ध करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून २८२२ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिंडी प्रमुखांना ४५०० मेडिसिन किटचे वाटप करण्यात येणार आहे.

९५ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त

जिल्हा परिषदेकडून वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, आपटा आदी जातींच्या दहा हजार वृक्षांची लागवड पालखी मार्गावर करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलांच्या व अश्वांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ९५ पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT