करकंब : सुगाव भोसे, ता. पंढरपूर येथील सोनाली नेताजी जाधव (वय 30) ही महिला दि 5 रोजी दुपारी 1 वा.चे सुमारास नातेवाईकांना पंढरपूर येथे कामानिमित्त जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. ती परत न आल्याने (दि. 8) वडिलांनी करकंब पोलिस ठाणे येथे ती हरविल्याबाबत तक्रार नोंद केली होती. पोलिसांना सोनाली जाधव ही रोपळे येथे कॅनॉलमध्ये मृत आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा उलगडा करुन अनैतिक संबंधातून तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे याने खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोनाली जाधव हिची मिसिंग तक्रार दाखल झाल्याने याचा तपास पोहेकॉ बापुसाहेब मोरे हे करीत होते. दि. 9 रोजी दुपारी 2 वा.चे सुमारास उजनी कॅनॉल रोपळे येथे एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. दि. 11 रोजी दुपारी नातेवाईकांनी सदर मृतदेहावरील कपडयावरुन व पायातील जोडव्यावरुन सोनाली जाधव असल्याची खात्री झाली. पोलिसांनी लागलीच तांत्रिक माहिती व गोपनीय माहिती वरुन सदर महिलेचे तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे (वय-37) रा. भोसे ता. पंढरपूर याच्यासोबत अनैतिक संबध असल्याचे स्पष्ट झाले. दि 5 रोजी सोनाली ही तुकाराम उर्फ बुवा याचे सोबत असल्याचे सीसीटिव्ही फुटेज तपासल्यावर निष्पन्न झाले.
त्यावरुन तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे यास ताब्यात घेवून त्याचे कडे तपास केला असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिस खाक्या दाखविताच आरोपीने सोनाली हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच सोन्याचे नेकलेस घेण्यासाठी झालेल्या वादातून तिचा गळा दाबून खून केला. ती बेशुध्द पडल्यावर भोसे येथे उजनी कॅनॉल मध्ये फेकून खून केल्याचे आरोपी यांनी कबुली दिली आहे. याबाबत मयत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरुन करकंब पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रतिम यावलकर सो, सहा. पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलिस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोहकॉ बापूसाहेब मोरे, संदेश शिकतोडे, बालाजी घोळवे, सागर भोसले, असिफ आतार, पोकॉ समाधान माने, निखील काळे, शाम गायकवाड, स्वप्नील बागल, शेखर भोसले, रतन जाधव यांनी केलेली आहे.