वाळू उत्खनन File Photo
सोलापूर

Pandharpur Forest Officer Attack : महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला; वाळू तस्करांवर होणार तडीपारीची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील खरातवाडीचा प्रश्न विधिमंडळात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खरातवाडी येथे अवैध मुरूम उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महिला वन अधिकारी शीतल चाटे यांच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू तस्करांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापुढे महसूल, वन आणि पोलिस विभाग संयुक्त टास्क फोर्सच्या माध्यमातून वाळू व मुरूम माफियांविरुद्ध मोहीम राबवतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

आ. समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा परिसरातील वाढत्या तस्करांच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात मांडला. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, महिला अधिकाऱ्यांवरील हल्ला ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल केले असून वन कायद्यानुसारही संशयितांवर कारवाई सुरू आहे.

तस्करांवर वचक बसवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मंत्री बावनकुळे म्हणाले की, आता ड्रोन मॅपिंग प्रणाली विकसित केली जात आहे. ज्या ठिकाणी उत्खनन सुरू असेल, तिथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि गुगल मॅपच्या आधारे देखरेख केली जाईल. यामुळे अवैध उत्खनन आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल. अवैध उत्खननाच्या मागे मोठे रॅकेट कार्यरत असले तरी, आता पोलीस, महसूल आणि वन विभाग एकत्रितपणे ताकदीने या माफियांवर तुटून पडतील, असा विश्वासही महसूल मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढे पोलिस, महसूल विभागाचे जॉईंट ऑपरेशन

अधिकारी अनेकदा एकटे कारवाई करायला जातात, तेव्हा असे हल्ले होतात. त्यामुळे आता गृह आणि महसूल विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे की, कोणतीही धाड टाकताना किंवा अवैध वाहतूक रोखताना पोलीस आणि महसूल विभागाचे जॉइंट ऑपरेशन (संयुक्त मोहीम) अनिवार्य असेल. पोलिसांनी आधीच संरक्षण देण्याची योजना तयार केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT