पंढरपूर : उजनी व वीर धरणांतील विसर्गामुळे चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या नदीपात्रात १ लाख ५ हजार ९७९ क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पुराचे पाणी व्यासनारायण झोपडपट्टीत शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाने शंभर कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी व वीर धरणांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की, चंद्रभागा नदीच्या संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी. नगरपालिका प्रशासनाने रायगड भवन पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. संभाव्य पूर परिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था केली आहे. स्थलांतरित नागरिकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत मोफत भोजन व्यवस्था केल्याचेही मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले. तर चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थितीच्या वेळी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रणिता भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी भेट देऊन केले आहे.
चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीतील काही घरांत पाणी शिरले आहे. तेथील कुटुंबांचे स्थलांतर केले असून, त्यांच्या जेवणाची व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे.- महेश रोकडे, मुख्याधिकारी